महानगरपालिकेचा अजब कारभार
शहरात मार्च महिन्यात केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचे निमित्त करून महानगरपालिका प्रशासनाने आपले सर्व लक्ष कोरोना संसर्ग दूर करण्यावर केंद्रित केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखला गेला पाहिजे याबाबत दुमत नाही.मात्र हे सर्व करीत असताना प्रशासनाने शहरातील नागरी सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. गेल्या सप्ताहात सलग पाऊस पडला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरात कोरोनाचा आकडा 19 हजार पार गेला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन चांगले काम करीत आहे. मनपाच्या कामाची दखल राज्य सरकार तसेच उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जात आहे मात्र दुसरीकडे नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. शहरातील प्रमुख रस्ते शासकीय दूध डेअरी ते शहानुरमिया दर्गा चौक ,दर्गा चौक सुतगिरणी चौक, एमआयडीसी रोड, जयभवानी नगर ते मुकुंदवाडी स्टेशन रोड, सिडको बस स्थानक ते हर्सूल टी पॉइंट जळगाव रोड, मुकुंदवाडी ते चिकलठाणा रोड, पुंडलिक नगर रोड, बीड बायपास या ठिकाणी खड्डे पडले आहेत. गुलमंडी रोड रंगारगल्ली,चेलीपुरा रोड ,गांधी पुतळा शहागंज ते हर्षनगर रोड, फाजलपुरा रोड, सिडको हडकोतील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अवस्था झाली आहे. हे खड्डे बुजविण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. दरवर्षी दुरुस्तीसाठी मनपा वेगळा निधी ठेवते. पण सध्या नगरसेवकांची बॉडी मुदत संपल्याने मनपावर प्रशासकीय ताबा आहे.सध्या सर्व अधिकार प्रशासकांच्या हाती आहे. पण प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचे खड्डयांकडे लक्ष नाही.गतवर्षी खड्डयांमुळे महानुभव रोड चौक बीड बायपास या ठिकाणी खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होऊन काहींना आपले जीव गमवावे लागले होते .लोकांचे बळी जाऊ नये याकरिता रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.